Yellow 'a-connect' text on a black background.

November 2026

कव्हर स्टोरी

'उद्या'च्या धारावीची प्रत्यक्षदर्शी 'झलक'

राखी कनकने

✅ Link Copied!

तब्बल 22,500 चौरस फुटांवर उभारण्यात आलेल्या एक्सपिरियन्स सेंटरच्या (अनुभव केंद्र) माध्यमातून धारावीकरांना नजिकच्या भविष्यातील धारावीची झलक मिळणार आहे. या सेंटरमध्ये पुनर्विकासित धारावीतील सॅम्पल फ्लॅट (नमुना सदनिका) तसेच, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारलेल्या विविध सादरीकरणांचा प्रत्यक्ष अनुभव रहिवाशांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे, धारावीतील रहिवासी, इथली उद्यमशीलता यांना केंद्रस्थानी ठेवून, धारावीचा 'आत्मा' जपून केल्या जाणाऱ्या पुनर्विकासाची माहिती या सेंटरच्या माध्यमातून रहिवाशांना मिळणार आहे.

भविष्यातील आपले हक्काचे घर नेमके कसे असेल? भविष्यातील घरात फर्निचरची मांडणी कशी करता येईल? आसपासच्या परिसराचा कायापालट कसा होईल?.. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता धारावीतील रहिवाशांना प्रत्यक्षदर्शी अनुभवातून मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, 2 ऑक्टोबर 2026 रोजी लोकार्पण करण्यात आलेल्या 'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'च्या माध्यमातून स्थानिकांना धारावीच्या भविष्यात डोकावता येईल. 'अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या (एएनडीपीएल) वतीने राबविण्यात येणाऱ्या 'धारावी पुनर्विकास प्रकल्पा'तील नियोजित घरे, सोयीसुविधा आणि भविष्यातील आसपासच्या परिसराचा अनुभव या सेंटरच्या माध्यमातून रहिवाशांना घेता येणार आहे.

सन 2035 पर्यंत, झोपडपट्टीमुक्त मुंबईसह प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य राज्य शासनाने निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर, धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे ज्यांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी मिळणार आहे, त्या रहिवाशांना भविष्यातील धारावीची सैर घडविण्यासाठी एक्सपिरियन्स सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या सेंटरच्या मध्यभागी एकूण 4 सॅम्पल फ्लॅट्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये पुनर्विकासात नियोजित असलेली 350 चौरस फुटांची सदनिका आणि नूतनीकरण धोरणातील 500 चौरस फुटांच्या सदनिकांचा समावेश आहे. यातील 2 सदनिकांमध्ये फर्निचरची मांडणी केलेली असून 2 सदनिका फर्निचरशिवाय आहेत. घराचे लेआऊट, किचन प्लॅटफॉर्म, बाथरूम, पाण्याची व्यवस्था आणि हवा खेळती राहण्यासाठी केलेली व्यवस्था या सगळ्या बाबी इथे रहिवाशांना प्रत्यक्षात पाहता येतील. फर्निचर, इतर समान आणि अगदी घरातीलच एखाद्या छोट्या उद्योगासाठी सामग्रीची नेमकी मांडणी भविष्यातील घरामध्ये कशी करता येईल, याचा अंदाज यातून रहिवाशांना मिळू शकेल. धारावीकरांना केवळ पुनर्विकासाचे आराखडे किंवा डिजिटल सादरीकरण न दाखवता पुनर्विकासात उभारल्या जाणाऱ्या घराची प्रत्यक्ष सफर घडवून त्यांना भविष्याची अनुभूती देण्याचा उद्देश या सेंटरच्या उभारणीमागे आहे.

मात्र, धारावीकरांना केवळ त्यांच्या पुनर्विकसित घरांचा अनुभव न देता, त्यांना खऱ्या अर्थाने भविष्यातील भवताल प्रत्यक्षात दाखविण्याचे काम या सेंटरच्या माध्यमातून केले जात आहे. रहिवाशांसोबत थेट संवाद साधणारे सादरीकरण, डिजिटल प्रदर्शने आणि मांडणीशिल्पे यांमुळे हे सेंटर रहिवाशांना वेगळी अनुभूती देते. भविष्यात धारावीतील निवासी परिसर, व्यावसायिक आणि औद्योगिक जागा, अद्ययावत आरोग्यसुविधा, दर्जेदार सार्वजनिक सुविधा, प्रार्थनास्थळे आणि बहुद्देशीय वाहतूक व्यवस्था यांची इत्थंभूत माहिती या सेंटरमधून रहिवाशांना मिळू शकेल. निवास आणि उपजीविका यांचा सुंदर मिलाफ असलेल्या उद्यमशील धारावीची ओळख जपून केला जाणारा भविष्यातील कायापालट इथे अनुभवता येईल.

पारंपरिक पद्धतींना छेद देऊन धारावी एक्सपिरियन्स सेंटरने नवा पायंडा पाडला आहे. हे सेंटर केवळ घरांची माहिती देणारे ठिकाण नसून, धारावीतील रहिवासी, व्यावसायिक आणि येथे वास्तव्य करणाऱ्या हजारो कुटुंबाशी पारदर्शक पद्धतीने थेट संवाद साधण्याची संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. पुनर्विकासानंतर होणारा कायापालट प्रत्यक्ष दाखवून आणि याबाबतची माहिती सोप्या पद्धतीने सांगून, रहिवाशांचा विश्वास संपादन करण्याची महत्त्वाची भूमिका या सेंटरच्या माध्यमातून बजावली जाईल.

हेच सूत्र वास्तुरचना आणि अंतर्गत सजावटीच्या बाबतीतही अंगिकारण्यात आणलेले दिसून येते. सामाजिक आणि आर्थिक बदलांसोबत जुळवून घेण्याची धारावीची क्षमता अधोरेखित करण्यासाठी, संपूर्ण सेंटरची रचना लाटांच्या आकारापासून प्रेरित आहे. सद्यःस्थितीतील भौगोलिक धारावीची नक्कल करण्याऐवजी, उद्यमशीलता, जिद्द, संघर्षावर मात करण्याची लढाऊ वृत्ती आणि एकोपा टिकवणारी संवेदनशीलता ही धारावीची गुणवैशिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून या सेंटरची मांडणी करण्यात आली आहे. हिरवळ, नैसर्गिक प्रकाश आणि स्नेहार्द्र मांडणी यांमुळे हे सेंटर मोकळ्या संवादासाठी अधिक अनुकूल ठरू शकेल.

या संवादप्रक्रियेमध्ये येथे धारावीच्या संस्कृतीचादेखील मानाचे स्थान देण्यात आले आहे. चर्मोद्योग, बांबू काम, भरतकाम, टेराकोटा, ब्लॉक प्रिंटिंग, कुंभारकाम अशा येथील पारंपारिक उद्योगांपासून प्रेरणा घेऊन साकारण्यात आलेल्या कलाकृती इथे मांडण्यात आल्या आहेत. धारावीतील पिढीजात कला आणि उद्योगांचा अनोखा गौरव करून आधुनिक विकास, स्थानिक संस्कृती आणि रोजगार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे.

‘धारावी का कल बुला रहा है’ (उद्याची धारावी खुणावतेय) या संकल्पनेतून उभारण्यात आलेले एक्सपिरियन्स सेंटर, धारावीच्या भूतकाळाला येथील आशादायी भविष्यकाळाशी जोडते. नियोजित पुनर्विकासात येथील स्थानिकांना नेमके काय मिळेल, हे स्पष्ट करताना सगळ्या वैशिष्ट्यांसह धारावीचा 'आत्मा' जपण्याचे महत्त्वाचे काम या सेंटरच्या माध्यमातून केले जात आहे.

धारावीचा नवा अध्याय सुरू झाल्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उभारण्यात आलेल्या एक्सपिरियन्ससेंटरमुळे भविष्यातील घरे, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक जीवन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चेला सुरुवात झाली आहे. पुनर्विकासाची संकल्पना समजून घेताना, भविष्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी या सेंटरच्या माध्यमातून धारावीकरांना उपलब्ध झाली आहे. स्थानिक रहिवाशांना केंद्रस्थानी ठेवून, उद्यमशील धारावीच्या भविष्याची प्रत्यक्ष सफर या सेंटरच्या माध्यमातून करता येणार आहे.